२ ९ जून २ ० २ ६
मुंबई : मुंबईतील लोकल प्रवाशांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वी लोकल ट्रेनमध्ये झालेल्या प्रवाशाच्या हत्येची घटना ताजी असतानाच आता माहीम रेल्वे स्थानकाबाहेर एका ३५ वर्षीय प्रवाशावर अज्ञात व्यक्तीने चाकूने सपासप वार केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा संपूर्ण प्रकार केवळ रस्त्यावर चालताना झालेल्या किरकोळ धक्क्यामुळे घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी प्रवाशाचे नाव नवीन प्रसन्ना (वय ३५) असून तो माहीम परिसरात कुटुंबासह राहतो. तो लोअर परळ येथील एका खासगी कंपनीत ऑफिस बॉय म्हणून काम करतो. गुरुवारी रात्री सुमारे १०.१५ वाजण्याच्या सुमारास काम संपवून तो नेहमीप्रमाणे लोकलने माहीम स्थानकावर उतरला. स्थानकाबाहेर सेनापती बापट मार्गावरील पदपथावरून घरी जात असताना त्याचा समोरून येणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीला हलकासा धक्का लागला. या धक्क्यामुळे त्या व्यक्तीचा मोबाईल फोन खाली पडल्याचा दावा आरोपीने केला.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, नवीन प्रसन्ना यांनी लगेचच त्या व्यक्तीची माफी मागितली. मात्र आरोपीचा राग शांत झाला नाही. त्याने मोबाईल खराब झाल्याचा आरोप करत नुकसानभरपाईची मागणी केली. नवीन यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपी अधिकच संतापला. काही अंतरापर्यंत त्याचा पाठलाग करत त्याने अचानक धारदार चाकू बाहेर काढला आणि नवीन यांच्या शरीरावर अनेक वार केले. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या नवीन यांना पाहून परिसरातील नागरिक धावले, तर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.
जखमी अवस्थेतील नवीन प्रसन्ना यांना तातडीने जवळच्या सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. दुसरीकडे, माहीम पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा प्रयत्न आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.
विशेष म्हणजे, ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा दोनच दिवसांपूर्वी चर्चगेट–नालासोपारा लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ वादातून २२ वर्षीय प्रवासी मयंक लोहार याची चाकूने हत्या करण्यात आली होती. त्या घटनेनंतर मुंबई लोकलमधील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असतानाच आता माहीम स्थानकाबाहेरील हा हल्ला समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सलग दोन चाकूहल्ल्यांच्या घटनांमुळे सार्वजनिक ठिकाणी वाढणारी हिंसक प्रवृत्ती आणि धारदार शस्त्रांसह मोकळेपणाने फिरणाऱ्या गुन्हेगारांविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर रेल्वे परिसर आणि स्थानकाबाहेरील सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्याची मागणी जोर धरत आहे. रेल्वे पोलिसांनीही अलीकडील घटनांनंतर स्थानकांवर प्रवाशांच्या बॅगांची तपासणी अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.


Leave a comment