मानकापूरमध्ये शेडखाली झोपलेल्या व्यक्तीची कुऱ्हाडीने हत्या; पोलिसांची तत्पर कारवाई, एकाला अटक

नागपूर : मानकापूर परिसरात शेडखाली झोपलेल्या एका ४३ वर्षीय व्यक्तीची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली. या प्रकरणाचा काही तासांतच उलगडा करत मानकापूर पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली आहे.

मृताचे नाव मेहताबसिंग सोहनलाल चौधरी (वय ४३) असे असून ते बांधकाम मिस्त्री म्हणून काम करत होते. ते गोधनी रेल्वे परिसरातील जमील सोसायटीत कुटुंबासह राहत होते. शुक्रवारी रात्री जेवणानंतर ते घराबाहेरील लोखंडी शेडखाली झोपले होते. पहाटेच्या सुमारास आरोपीने त्यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या मेहताबसिंग यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच मानकापूर पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही तासांत संशयित आरोपीचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

प्राथमिक तपासात हा खून कौटुंबिक वादातून झाल्याचे समोर आले आहे. मृत व्यक्ती आपल्या विवाहित मुलीला तिच्या पतीकडे परत पाठवण्याच्या भूमिकेवर ठाम होते. याच कारणावरून मुलीच्या प्रियकराच्या मनात संताप निर्माण झाला आणि त्याने ही हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या जलद कारवाईमुळे गंभीर गुन्ह्याचा अल्पावधीत उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.

Leave a comment